Ad will apear here
Next
हिंदुस्थानी रागसंगीताचे प्रसारक पं. रविशंकर
पं. रविशंकर

पाश्चात्य रसिकांना आपल्या सतारवादनाद्वारे हिंदुस्थानी रागसंगीताची ओळख करून देऊन, त्याची लोकप्रियता वाढवण्याचं फार मोठं काम पं. रविशंकर यांनी केलं. फक्त सतारवादनाचे कार्यक्रम न करता त्यांनी हिंदुस्थानी संगीत आणि पाश्चात्य संगीत यांच्यात संवादाचा पूल बांधला. सात एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सूररंगी रंगले’ या सदरात मधुवंती पेठे यांनी लिहिलेला लेख आज पुनर्प्रकाशित करत आहोत.
..........
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करणाऱ्या कलाकारांमध्ये पं. रविशंकर यांचा फार मोठा, मोलाचा वाटा आहे. पाश्चात्य रसिकांना आपल्या सतारवादनाद्वारे हिंदुस्थानी रागसंगीताची ओळख करून देऊन, त्याची लोकप्रियता वाढवण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलं. केवळ संगीत रसिकच नाही, तर तिथले पाश्चात्य संगीतकारसुद्धा या रागसंगीताकडे आकृष्ट झाले. तिथल्या संगीतकारांवर पं. रविशंकर यांच्या सतारवादनाचा प्रभाव पडला आणि हिंदुस्थानी संगीतातल्या रागसंगीताचा वापर पाश्चात्य संगीतकार त्यांच्या रचनांमध्ये करू लागले, ही फार महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल. सुप्रसिद्ध व्हायोलीनवादक यहुदी मेनुहिन आणि बीटल्स ग्रुपचे गायक, गिटारवादक जॉर्ज हॅरिसन ही त्यापैकी महत्त्वाची नावं. 

फक्त सतारवादनाचे कार्यक्रम न करता पं. रविशंकर यांनी हिंदुस्थानी संगीत आणि पाश्चात्य संगीत यांच्यात संवादाचा पूल बांधला, तो महत्त्वाचा ठरतो. या दृष्टीनं पंडितजींच्या कार्याची ओळख करून घेऊ या. 

सात एप्रिल १९२० रोजी त्यांचा जन्म झाला. आपल्या ९२ वर्षांच्या संपन्न आयुष्यात पं. रविशंकर यांनी शेवटपर्यंत संगीताची सेवा केली. रवींद्र शंकर चौधरी हे त्यांचं मूळ नांव. बनारसचा जन्म. बंधू उदय शंकर, राजेंद्र शंकर, वहिनी लक्ष्मी शंकर... सर्वच कलाकार. 

आपल्याला माहीत नसेल कदाचित, की १९३० ते १९३८पर्यंत रविशंकर हे उदय शंकर यांच्या ग्रुपमध्ये एक नर्तक (डान्सर) म्हणून काम करत होते. तरुण वयात त्यांनी उदय शंकर यांच्याबरोबर भारतभर आणि युरोपमध्ये अनेक दौरे केले. त्या काळात पाश्चात्य जीवनशैली, वेस्टर्न क्लासिकल संगीत, फ्रेंच भाषा, ऑपेरा (संगीतिका) अशा अनेक गोष्टींशी त्यांचा परिचय झाला. त्याच काळात कलकत्त्याचे उस्ताद बाबा अलाउद्दीन खाँ त्यांच्या ग्रुपमध्ये सोलो वादक म्हणून आले आणि त्यांचं वादन ऐकून सतारवादनाची ओढ रविशंकरांच्या मनात निर्माण झाली. टूरवर असताना तीन-चार वर्षं त्यांनी खाँसाहेबांकडे सतारवादनाचं शिक्षण घेतलं; पण बाबा अलाउद्दीन खाँ यांच्या सांगण्यावरून १९३८ साली त्यांनी नृत्य सोडण्याचं ठरवलं आणि ते अलाउद्दीन खाँ यांच्याकडे मैहरला (मध्य प्रदेश) गुरुकुल पद्धतीनं सतारवादन शिकायला राहिले. 

सूरबहारधृपद, धमार गायकीबरोबर ख्याल गायकीमध्येही मैहर घराण्याची तालीम त्यांनी घेतली. त्या वेळी ते सतार आणि सूरबहार (सतारीप्रमाणेच असलेलं वाद्य) या दोन्हींचं वादन करत असत. १९४४पर्यंत त्यांचं शिक्षण चालू होतं. 

त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम केला, तो अलाउद्दीन खाँ यांचे सुपुत्र अली अकबर खाँ यांच्या सरोदवादनाबरोबर जुगलबंदी करून अलाहाबाद येथे. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या विचारांनी आणि कल्पकतेनं स्वत:चं करिअर चौफेर प्रगती करत फुलवलं, घडवलं. इथून पुढे त्यांनी केलेल्या निरनिराळ्या प्रयोगांची विविधता पाहिली, की तुम्हाला जाणवेल, की त्यांनी केवळ एक ‘परफॉर्मिंग आर्टिस्ट’ न राहता, कंपोझर, लेक्चरर, संगीत दिग्दर्शक, शिक्षक अशा अनेक अंगांनी संगीताच्या क्षेत्रात काम केलं. त्यातील विविधता, त्यामागचा त्यांचा विचार पाहिला, की संगीताच्या क्षेत्रात किती त्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे, याची कल्पना येते आणि एक द्रष्टा कलाकार म्हणून त्यांचं वेगळेपणही जाणवतं. 

पं. रविशंकर यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांकडे पाहू... 

- मुंबईच्या ‘इप्टा’च्या बॅलेसाठी संगीत नियोजन. 

- ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ या गीताचं संगीत 

- गोदान, अनुराधा यांसारख्या हिंदी चित्रपटांना संगीत. 

- ऑल इंडिया रेडिओच्या दिल्ली केंद्रावर ऑर्केस्ट्राची निर्मिती. त्यांचे नावीन्य हे, की त्यात त्यांनी पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा मेळ घालून ऑर्केस्ट्रासाठी कंपोझिशन्स केल्या. 

- तिथे पाश्चात्य व्हायोलीनवादक यहुदी मेनुहिन यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्याबरोबर त्यांनी युरोप, अमेरिकेत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. यहुदी मेनुहिन यांच्यावर पंडितजींच्या वादनाचा प्रभाव पडला. दोघांच्या एकत्रित कार्यक्रमाला अमाप लोकप्रियता लाभली. त्या दोघांच्या वादनाच्या ‘वेस्ट मीट्स इस्ट’ या अल्बमला ग्रॅमी ॲवॉर्ड मिळाला. 

- पॉप संगीतामध्ये रागसंगीताचा उपयोग, ही तर विलक्षण घटना. बीटल्स ग्रुपचा पॉप गायक, कंपोझर, गिटारवादक जॉर्ज हॅरिसन. पंडितजींच्या सतारवादनानं प्रभावित झालेला जॉर्ज पंडितजींचा चक्क शिष्य झाला. मुंबईला येऊन त्यानं पंडितजींकडून हिंदुस्थानी रागसंगीताचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याच्या पॉप संगीताच्या अनेक रचनांमध्ये हिंदुस्थानी रागांचा वापर दिसायला लागला. 

- पन्नासच्या दशकात यूके, जर्मनी, अमेरिका, रशिया येथे दौरे करताना पंडितजी आणखी एक अनोखा प्रयोग करत असत. संख्येनं छोट्या ऑडियन्ससमोर ते ‘लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन’ पद्धतीनं हिंदुस्थानी संगीतातल्या निरनिराळ्या रागांचा परिचय करून देत असत. सुजाण श्रोते तयार करण्याचं हे फार मोठं काम त्यांनी केलं. परदेशातल्या रसिकांना रागसंगीताचा रसास्वाद घ्यायला त्यांनी शिकवलं. पुढे वाद्यवादनाच्या कार्यक्रमाचे दौरे करणाऱ्या अनेक कलाकारांना, पंडितजींनी रुजवलेल्या या रसिकतेचा निश्चितच फायदा झाला. 

- त्यांच्या शास्त्रीय सतारवादनाची पहिली एलपी रेकॉर्ड लंडनला निघाली आणि लोकप्रिय झाली. 

- युनेस्को म्युझिक फेस्टिव्हल - पॅरिस आणि युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी वादनासाठी आमंत्रणं. १९७० आणि १९८० च्या दशकात जगभर दौरे. 

- लंडनच्या सिंफनी ऑर्केस्ट्राचे चीफ कंडक्टर संगीतकार झुबेन मेहता यांच्याबरोबरही त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्यांचं आमंत्रण स्वीकारून लंडनला केलेल्या कार्यक्रमाच्या लाइव्ह रेकॉर्डिंगचा अल्बम निघाला. त्या अल्बमला ‘बेस्ट सेलिंग अल्बम’ यासाठी पंडितजींना पुन्हा ग्रॅमी ॲवॉर्ड मिळाला. 

- परदेशी चित्रपटांना संगीत देणारे ते पहिले भारतीय संगीतकार होते. 

- मुंबईत त्यांनी स्थापन केलेलं ‘किन्नर स्कूल ऑफ म्युझिक,’ न्यूयॉर्कचं सिटी कॉलेज, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी लेक्चरर म्हणून काम केलं. 

- रशियात मॉस्को येथे १४० वादकांबरोबर वादन, ज्यात भारतीय आणि रशियन अशा दोन्ही वादकांचा समावेश होता. तसंच बीबीसी रेडिओनंही त्यांना वादनासाठी सन्मानानं निमंत्रित केलं. 

- २००० साली त्यांना ‘बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बम’साठी असलेला ग्रॅमी ॲवॉर्डही मिळाला. 

- परदेशातल्या संगीत विश्वात, ग्रॅमी ॲवॉर्ड हा अत्यंत मानाचा पुरस्कार समजला जातो. संपूर्ण जगभरातील संगीताचा विचार करून यासाठी कलाकार निवडले जातात. हा पुरस्कार पंडितजींना तीन वेळा मिळाला. लॉस एंजलीसच्या ग्रॅमी म्युझियममध्ये पुरस्कारप्राप्त पंडितजींचे फोटो पाहिले, तेव्हा आनंदानं आणि अभिमानानं माझं मन भरून आलं होतं. 

- पुढे त्यांची कन्या आणि शिष्या अनुष्का शंकर हिच्याबरोबरही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. 

बापरे.... ठळक घटनांची ही नुसती यादी बघूनच थक्क व्हायला होतं. अजूनही बरंच काही माझ्याकडून राहिलं असेल. यातली विविधता, त्यामागचा त्यांचा विचार पाहिला, की त्यांनी संगीताच्या क्षेत्रात त्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे, याचं महत्त्व पटतं आणि एक द्रष्टा कलाकार म्हणून त्यांचं वेगळेपणही जाणवतं. 

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत.)











 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZWRCL
Similar Posts
ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या आठवणी ३० जानेवारी हा नामवंत ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सूररंगी रंगले’ सदरात मधुवंती पेठे आज लिहीत आहेत त्यांच्या आठवणी...
स्वराभिषेक दीपावली संध्या २०२० । भाग १ (व्हिडिओ) 'स्वराभिषेक'तर्फे दर वर्षी रत्नागिरीत दिवाळी पहाटची सांगीतिक मैफल आयोजित केली जाते. यंदा करोनामुळे ती प्रथा खंडित होऊ नये, यासाठी दीपावली संध्या हा कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आला आहे. त्या मैफलीचा हा पहिला भाग...
स्वराभिषेक दीपावली संध्या २०२० । भाग २ (व्हिडिओ) 'स्वराभिषेक'तर्फे दर वर्षी रत्नागिरीत दिवाळी पहाटची सांगीतिक मैफल आयोजित केली जाते. यंदा करोनामुळे ती प्रथा खंडित होऊ नये, यासाठी दीपावली संध्या हा कार्यक्रम व्हर्च्युअल आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात 'स्वराभिषेक'च्या बालकलाकारांनी आपली कला सादर केली आहे.
कभी खुद पे कभी हालात पे... ‘हम दोनों’च्या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाण्यांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार जयदेव यांचा जन्मदिन तीन ऑगस्टला होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम दोनों’मधीलच ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ या गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language